प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामसेवक गोरख दिनकर गिरीगोसावी (वय 50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गावठाण फेरफार नोंदी उतारा देण्या कामी तक्रार दाराकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहात पकडले.
सध्या हा ग्रामसेवक प्रयाग चिखली बरोबरच खुपिरे गावातही ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता.लाचखोर ग्रामसेवक गिरीगोसावी हा सध्या राहणार पंत मंदिराजवळ शिवाजीनगर कणेरी वाडी (ता. करवीर) तर मूळ राहणार सिंगापूर ता. पुरंदरे जिल्हा पुणे येथील आहे.
त्याच्यावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतचे अधिक माहिती अशीप्रयाग चिखली गावचे पुनर्वसन सोनतळी येथे झाले आहे येथील पुनर्वसित असलेल्या गावठाण मिळकतीचा फेरफार उतारा तक्रारदाराने अर्जाद्वारे मागणी केली होती या उतारासाठी लाचखोर ग्रामसेवक गिरी गोसावी यांनी दोन हजार रुपयाची लाच मागितली होती त्यावेळी तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खुद्द ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गोरख गिरीगोसावी यास रंगेहात पकडले. दरम्यान गिरी गोसावी हा जून 2022 पासून प्रयाग चिखली येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. येथील सर्वसामान्य पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या दाखल्याबाबत तो लाच मागायचा .
त्यामुळे येथील पूरग्रस्त आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमधूनही गिरीगोसावी यांच्या कार्यप्रणाली बाबत संताप व्यक्त होत होता. काही दिवसापूर्वी सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवक गिरीगोसावी यांने येथील अंगणवाडी साठी आवश्यक नसलेले तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य भरमसाठ बिले लावून खरेदी केले यावर ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेऊन सदरचे साहित्य परत पाठवणेस भाग पाडले होते. या व्यवहारातही गिरीगोसावी याने गैरव्यवहार केला असून चौकशी चालू आहे.
सोनतळी येथील पुनर्वसन मधील बेकायदेशीरपणे चालू असलेल्या प्लॉट विक्री प्रकरणांमध्येही ग्रामसेवक गिरी गोसावी याने मोठा अर्थ शोधल्याची चर्चा गावामध्ये चालू आहे. लाचखोर ग्रामसेवक गिरी गोसावी हा खुपिरे गावातही ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्याच्यावरील कारवाईमुळे खुपिरे गावात खळबळ माजली आहे.