अपुऱ्या झोपेमुळे खरंच वजन वाढतं का…? घेऊया अधिक माहिती

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, काम आणि जेवण यासह झोप देखील महत्वाची आहे. शरीराला आराम हवाच. तज्ज्ञ ८ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे अनेक आरोग्यदायी समस्या उद्भवतात.मुख्य म्हणजे वजन वाढीची समस्या देखील निर्माण होते.

वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यात खाण्यापिण्याची चुकीची सवय, शरीराची हालचाल कमी, यासह आरामाचा अभाव, या कारणांमुळे वजन वाढते.झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या मनःस्थितीवर आणि दैनंदिन पचनावर परिणाम होतो. शिवाय वजनावर देखील होतो. पण झोपेचा आणि वजनाचा संबंध काय? या करणामुळे खरंच वजन वाढते का? याची माहिती पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिली आहे.

झोपेच्या कमतरतेचा होतो वजनावर परिणाम – झोपेच्या कमतरतेमुळे आपण फक्त आजारांना निमंत्रण देत नसून, वजन वाढण्यासाठी देखील कारण देतो.- पुरेशी झोप न मिळाल्यास इन्शुलिन रेझिस्टन्स आणि ग्लुकोज इंटॉलरेंस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ज्यामध्ये मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो.- बिघडलेली जीवनशैली त्यात अपुऱ्या झोपेमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी वजन कमी करणे आणखीन कठीण होऊन जाते.- झोपेच्या कमतरतेमुळे टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

शिवाय स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. – झोप न मिळाल्याने चयापचय क्रिया मंदावते. यामुळे थकवा जाणवतो, शिवाय संपूर्ण दिवस आळसात जातो.- झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन असंतुलित होते, ज्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढू शकते.- पूर्ण झोप न मिळाल्याने शरीर सुस्त राहते. अशा वेळी कॅलरीज कमी बर्न होतात आणि वजन कमी करणे कठीण वाटू लागते.