मुंबई : ”ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा,” अशा शब्दात माजी मंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असं चॅलेंजही दिलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटातील मंत्र्यांची बैठक सुरू आहे.या बैठकीला अजितदादा गटातील मंत्र्यांसह काही समर्थक आमदारही उपस्थित आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या हक्काची सुनावणी न्यायालयात सुरू असून शरद पवार यांनी स्वत: उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी, युक्तीवाद करताना अजित पवार गटाच्या वकिलांकडून शरद पवारांचा हुकूमशहा असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आव्हाड म्हणाले….
समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. की, ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.