कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.आगीमुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आगीचे खरे कारण समजू शकले नाही परंतु ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.सुमारे ५० एकरमध्ये जळालेला ऊस कारखाने सुरू होऊ पर्यंत शेतात राहणार असल्याने शेतकऱ्यानी चिंता व्यक्त केली.
अशातच ऑक्टोबर हीट सुरू झाल्याने ऊस पीके वाळू लागली आहेत. जळालेल्या उसाला पाणी न दिल्यास ऊस वाळून जाण्याची शक्यता आहे.याबाबत अधिक माहिती अशी हेरवाड – अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळ्याशेजारी ऊस शेतीला काल (ता.०९) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. बघता बघता आग पसरली व अंदाजे ३५ एकरांवरील क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
आलमट्टी’च्या उंचीचा घाट; कोल्हापूर, सांगलीची शेती होणार भूईसपाट? तीव्र विरोध होणार का?दरम्यान, आग लागलेल्या शेतात जाण्यासाठी पायवाट रस्ता असल्याने अग्निशामक वाहन जाण्यासाठी अडचण निर्माण झाली त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
धुळगोंडा पाटील, विजय पाटील, दयानंद पाटील, सुनिल बरगाले, सुनिल माळी, सातगौड पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश माळी, सुरेश माळी, प्रकाश पाटील आदी शेतकऱ्यांचा , ऊस जळून खाक झाला. वीज वितरण कंपनीने जळीत ऊस क्षेत्राचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
