मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू आहे.अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांचा हुकमी एक्का अजितदादांच्या गळाला लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांची जेलमधून सुटका झाली होती.त्यानंतर नवाब मलिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी नवाब मलिक यांची मनधरणी देखील करण्यात आली होती.
मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय आपण काही दिवसांनी जाहीर करू असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटातील ताकद वाढणार आहे.दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कारण, आपल्याकडे ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवार गटाने आधीच निवडणूक आयोगात केला आहे. आता नवाब मलिक यांनी पाठिंबा दिल्याने ही संख्या ४२ वर पोहचणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
