कोल्हापूर : काल दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिटयूट कडून औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. आज सकाळी आलेल्या बातमीनुसार यात आणखी ७ मृतांची भर पडून मृतांचा आकडा ३१ वर पोहचला आहे. यात १६ बालकांचा समावेश आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर मधिल घाटी रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशाचप्रकारे १३ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात १८ रुग्णांचा अपुऱ्या सुविधामुळे मृत्यू झाला होता. याबाबत दिनांक १४ ऑगस्ट २०२३ ला चौकशी समिती नेमली होती. या समितीने १० दिवसात अहवाल सादर करण बंधनकारक होत.
मात्र सदर समितीने हा अहवाल २७ सप्टेंबर रोजी दिला. या अहवालानुसार कोणीही दोषी नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.खरंतर एखादी दुर्घटना घडणं आणि नंतर चौकशी होण यापेक्षा वेळोवेळी आपल रुग्णालय सर्व आवश्यक साधन सुविधानी सज्ज असणं गरजेच आहे.
कोणतीही दुर्घटना आपल्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये घडू नये यासाठी कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील उपलब्ध औषधं साठा, त्या औषधांचा वैधता कालावधी, ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णालयाकडील आवश्यक सर्व उपकरणांची उपलब्धता आणि त्याची सद्यकार्यस्थिती, रक्त, लघवी इ. विविध तपासणी यंत्रणा, रुग्णवाहीका इ. यंत्रणा अद्यावत करणेबाबत भारतीय शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर शहरच्या वतीने कोल्हापूर शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच सदर बाबींमध्ये काही त्रुटी अथवा कमतरता असल्यास त्याची तातडीने पूर्तता करून जनतेची गैरसोय टाळावी. शासकीय रुग्णालयात सर्व सामान्य गोरगरीब जनता उपचार घेते, त्यांच्या जीवाशी कोणताही खेळ होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शेकाप चे कोल्हापूर शहर चिटणीस भाई बाबुराव कदम, सहचिटणीस भाई संभाजीराव जगदाळे, पुरोगामी युवक संघटना शहराध्यक्ष इंजि. अभिजीत कदम, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, शहर कार्यकारिणी सदस्य भाई मोहन पाटील, भाई मधुकर हरेर, भाई राजाराम धनवडे, युवक उपाध्यक्ष भाई चंद्रकांत सूर्यवंशी, भाई बाळकृष्ण जाधव,सौ. प्रिया जाधव, सौ. गीता जाधव, भाई प्रकाश शिंदे, भाई सचिन जाधव, भाई अस्लम बागवान आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.