कोल्हापूर: मलकापूर शहरातील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे (वय -५२ रा.मलकापूर ता.शाहूवाडी ) याला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.२ रोजी )मलकापूर शहरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की,’मलकापूर शहर हे एक शांतता प्रिय गाव म्हणून ओळखले जाते. पण मानव जातीला काळीमा फासेल असा प्रकार काल दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी टी.व्ही. बातमीच्या माध्यमातून उघडकीस आला व संपूर्ण शहर या घटनेने हादरून गेले आहे.
एका अपंग तरूण अविवाहीत मुलीवर अनिल गणपती भोपळे (५२ वर्षे) या नराधमाने अमानुष रित्या अत्याचार केले. या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीत आरोपीवर अतिशय कठोर प्रमाणात कारवाई करावी. आरोपीला मदत करणाऱ्या व पिडीतेच्या आई, वडील व भाऊ यांना धमकावणाऱ्या आरोपींचे साथीदार व नातेवाईकांना अटक करून त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे व त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात यावा.
सदरच्या आरोपीच्या पुतण्याचा मटका व सावकारी व तीनपत्तीचा व्यवसाय असल्याने त्यांचे व काही पोलीसांशी संपर्क आहे. तरी यांचे बेकायदेशीर व्यवसाय कायमचे बंद व्हावेत अन्यथा मलकापूर नागरीकांच्या तर्फे तीव्र उद्रेकाला सामोरे जावे लागेल आणि या घटनेचा तपास निपक्षपाती होणेसाठी तपास विशिष्ठ तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावा. पिडीत युवतीला कुंटूंबियांना न्याय मिळावा. तसेच अशा प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या लोकांना आळा बसावा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,यांच्यासह पिडीतेच्या नातेवाईकांसह व मलकापूर शहरातील नागरिक उपस्थित होते.हे निवेदनमुख्यमंत्री,गृहमंत्री,राज्य महिला आयोग,महाराष्ट्र राज्य,यांच्यासह प्रहार अपंग संघटनेचे आ. बच्चू कडू यांना पाठविण्यात आले आहे.
“शाहूवाडी पोलिसांवर नागरीकांचा रोषपीडित मुलीला कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले होते.यावेळी शाहूवाडी पोलिसांनी जवळपास अर्धा तास शाहूवाडी पोलीस ठाण्यात गाडी थांबिवली.पोलिसांनी हलगर्जीपणा आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप पिडीते सोबत आलेल्या नागरिकांनी केला आहे.