खासदार संजय राऊत यांचा जस्टिन ट्रूडो यांच्यावर निशाणा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडातील संबध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर मारल्याचा आरोप केल्यानंतर वाद सुरू झाला.दरम्यान, यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊत यांनी कॅनडावर टीका केली आहे.

“भारतीय एजन्सीने निज्जरला मारले की नाही, हा वेगळा मुद्दा आहे, पण भारतासारख्या देशाला देशाच्या संरक्षणासाठी अशी कारवाई करण्याचा अधिकार आहे. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला ठार मारले, त्याचे कॅनडासह जगातील अनेक देशांनी कौतुक केले.””मानवी कल्याणाच्या नावाखाली अमेरिकन सैन्याने इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेनला फाशी दिली.

अफगाणिस्तानात सैन्य दाखल करण्यात अमेरिका आणि रशिया पुढे होते. जेव्हा आपल्या देशाला धोका होता, तेव्हा त्यांनी उदात्त मानवतावादी हेतू असल्याचे दाखवून अशी कृत्ये केली. मग निज्जर घटनेत तुम्ही भारताला का दोष देता?” असा प्रश्न त्यांनी विचारला.राऊत पुढे म्हणतात, “कॅनडाचे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रूडो यांची लोकप्रियता कमी होत आहे. ट्रुडो यांच्याकडे बहुमतही नाही. अशा परिस्थितीत त्यांचे सरकार जगमीत सिंग यांच्या पक्षाच्या पाठिशी उभे आहे.

शिखांचा हा पक्ष खलिस्तानचा छुपा समर्थक आहे. भारतात राजकारणी चर्च, मंदिर आणि मशिदीचे राजकारण करतात, पण कॅनडात गुरुद्वाराच्या राजकारणाला महत्त्व आहे. कॅनडात गुरुद्वारांचे स्वतंत्र राजकारण आहे, पण त्यांनी त्यांचे धार्मिक राजकारण भारतीय भूमीत आणू नये,” असंही राऊत म्हणाले.