नवी दिल्ली : गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. जे लोक 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर खरेदी करतात त्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडरचे भाव आजपासून 200 रुपयांनी महागणार आहेत.
आयओसीएलच्या वेबसाईटवर तशी माहिती दिली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे. मात्र, घरगुती गॅसचे भाव जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर हा कमर्शिअल गॅस सिलिंडर मानला जातो. हॉटेल आणि इतर व्यावसायिक या गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत नसला तरी अप्रत्यक्ष भार हा जनतेवरच येतो.
कमर्शिअल गॅस सिलिंडर महागल्यावर हॉटेलमधील पदार्थही महागतात. त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच बसतो. आता आयओसीएलच्या वेबसाईटनुसार हा कमर्शिअल गॅस सिलिंडर 200 रुपयाहून अधिक रुपयाने वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांसह सामान्यांना त्याचा फटका बसला आहे.कुठे किती वाढनव्या दरवाढीनुसार नवी दिल्लीत 19 किलो ग्रॅम सॅस सिलिंडरचे दर 1731.50 रुपये झाले आहेत. कोलकातामध्ये गॅसचे दर 203.5 रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे कोलकात्यातील गॅसचे दर 1839.50 रुपये झाले आहेत. तर मुंबईत कमर्शिअल गॅसचे दर 1684 रुपये झाले आहेत.
चेन्नईत19 किलो गॅसच्या दरात 203 रुपयाने वाढ झाल्याने हा गॅस सिलिंडर 1898 रुपये झाला आहे.घरगुती गॅस जैसे थेदरम्यान, घरगुती गॅसचे दर जैसे थे आहेत. या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. सप्टेंबरमध्ये जी घरगुती गॅसची किंमत होती, तीच किंमत या महिन्यातही राहणार आहे. केंद्र सरकारने 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅसचे दर 200 रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या दरात कोणतेही बदल केले नाहीत.
गणेशोत्सव आणि ईद उत्सव संपन्न झाला आहे. आता दसरा, नवरात्र आणि दिवाळी तोंडावर आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचे दर आणखी कमी होतील, अशी लोकांना अपेक्षा होती. शिवाय चार राज्यांच्या निवडणुका असल्यानेही दरवाढ कमी होतील अशी घरगुती ग्राहकांना आशा होती. मात्र, घरगुती गॅसबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाहीये.