कोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी केवळ इव्हेन्ट करून, भाषणे करून चालणार नाही. तर त्यासाठी अल्पकालीन, दीर्घकालीन नियोजनबध्द कार्यक्रम हवा असे मत स्वयंसिध्दाच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गुरूवारी अथांग स्टे होम आणि कारवाॅं हाॅलिडेज यांच्यावतीने कोल्हापूरचे पर्यटन काल आज आणि उद्या या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यामध्ये हाॅटेल मालक संघाचे सचिन शानबाग, सहल संयोजक वासिम सरकावस, रवि सरदार, डाॅ. व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर, स्वंयसिध्दाच्या कार्यकारी संचालिका तृप्ती पुरेकर, निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनी सहभाग घेतला.
बंद पडलेले पर्यटन महामंडळाचे कार्यालय कोल्हापूरमध्ये सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. परूळेकर म्हणाल्या, जोपर्यंत आपण पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्वांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत वातावरण बदलणार नाही. यासाठी केवळ आणि केवळ प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. शहरातील चोहोबाजूंनी गाडीतून दिसणारे दिशादर्शक आणि कोल्हापुर जिल्ह्यात कोठे काय पहाल याचे मोठे फलक लावण्याची गरज आहे.
सचिन शानबाग म्हणाले, जेव्हा कोणाचेही पाठबळ नव्हते तेव्हा आम्ही अनेक कलाकारांना घेवून पुण्या, मुंबईत जावून कोल्हापूरचे मार्केटिंग करत होतो. समुद्र आणि वाळवंट सोडून सर्व काही कोल्हापुरात आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी केरळची जाहिरात परीख पुलाजवळ लावण्यात आली होती. परंतू कोल्हापूरचे तसे मार्केटिंग होत नाही.
रवि सरदार म्हणाले, करवीर दर्शन बस बंद का झाल्या याच्या कारणांचा शोध घेवून नव्याने बस सुरू केल्या पाहिजेत. आदमापूर हे नव्याने विकसित झालेले धार्मिक स्थळ आहे. तेथून बसची शटल सर्व्हिस आवश्यक असून प्रशिक्षित गाईड आणि स्वच्छ स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. डाॅ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर आणि स्वयंसिध्दाच्या कार्यकारी संचालिका तृप्ती पुरेकर यांनीही पर्यटन वाढीसाठी महिला बचत गट पूरक भूमिका बजावू शकतात असे सांगितले.
वासिम सरकावस म्हणाले, कोल्हापूर शहरातील रिक्षाचालक, हाॅटेल व्यावसायिक, प्रत्येक नागरिक हा कोल्हापूरचा ब्रॅंड अम्बॅसिडर आहे. त्यानुसारच प्रत्येकाने पर्यटकांशी वागायला हवे. अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडी, आदमापूर ही देवस्थाने कोल्हापूरच्या पर्यटनाची शक्तीस्थळे आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटकांची संख्या मोठी आहे. हे ध्यानात घेवून नियोजन आवश्यक आहे.
समीर देशपांडे म्हणाले, पर्यटनवाढीसाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी, शासन, स्वयंसेवी संस्था, पर्यटन व्यवसायातील लाभार्थी व्यावसायिक यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच पर्यटनवृध्दी होवू शकते. पालकमंत्री, जिल्हाधिकारी बदलल्यानंतर प्राधान्यक्रम न बदलता पर्यटनवाढीसाठी दीर्घकालीन आराखड्याचीच अंमलबजावणी व्हायला हवी. केवळ पेव्हिंग ब्लाॅक्स घालून आणि सभामंडप उभारून पर्यटन वृध्दी होणार नाही.