मेंढरांच्या कळपावर वन्य प्राण्यांचा हल्ला ३२ बकरी ठार… १६ गंभीर जखमी.. २२ बेपत्ता

राधानगरी: (अरविंद पाटील ) जत तालुक्यातील कुंभारी व बागेवाडी शिवेवर असणाऱ्या सरकारी दवाखान्याजवळ नानासाहेब पडोळकर यांच्या शेतात मेंढरांचा कळप बसायला असताना लांडगा सदृश्य १० ते १२ वन्यप्राण्यांनी मंगळवार दि. २६/१०/२३ रोजी पहाटे एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला या हल्यात ३२ बकरी ठार १६ गंभीर जखमी. तर २२ बकरी बेपत्ता आहे.

मेंढरांच्या कळपावर लांडगा सदृश्य प्राण्यांनी एवढा मोठा हल्ला करण्याची पहिलीच घटना आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की बिरू विठू जोंग हे राशिवडे बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी असून भटकंती करत त्यांच्या मेंढरांचा कळप सद्या परतीच्या मार्गावर असताना जत तालुक्यातील बागेवाडी (कुंभारी)येथील शेतकरी नानासाहेब बळवंत पडोळकर, यांच्या पडोळकर वस्तीजवळ सरकारी दवाखान्याशेजारी मालकीच्या (गट नंबर २५६) शेतात बसायला असताना लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांनी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान हल्ला केला या हल्ल्यात ३२ मेंढरं ठार १६ गंभीर जखमी तर २२ मेंढरं बेपत्ता आहेत,लाडग्यांना प्रतिकार करण्यासाठी विठू जोंग गेले असता लांडगे त्यांच्या ही अंगावर धावून जात होते. मेंढरं संपूर्ण तीन चार किलोमीटरच्या परिसरात विखरून मृतावस्थेत अर्धवट खाल्लेल्या स्थितीत पडलेली होती. पाऊस पडत असल्याने रात्री लवकर मदत मिळाली नाही लांडग्यांचा धुमाकूळ जवळपास तासभर सुरू होता..

सकाळी मेंढपाळ बिरू जोंग यांनी हि घटना यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांना सांगितली व मदतीसाठी विनंती केली.घटना समजताच तातडीने राम कोळेकर व संजय वाघमोडे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले कवठेमंकाळ शाखाध्यक्ष अनिल बंडगर हे तातडीने घटनास्थळी वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह दाखल झाले. राहुल चौगुले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळवून घटनास्थळी पाठवले.या हल्ल्यात मेंढपाळांचे जवळपास सात लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना भर पावसातच घडली.

प्रविण पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी जत,चंद्रकांत ढवळे वनपरिमंडळ अधिकारी,विद्या घागरे वनरक्षक हिवरे, भैरवनाथ यादव वनरक्षक,कुंभारी,यांनी मृत बकऱ्यांचा पंचनामा केला.डॉ. राठोड पशुसंवर्धन अधिकारी कुंभारी, प्रमोद सोने परिचर यांनी जखमी बकऱ्यांच्यावर उपचार व मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. मेंढपाळ व वडील दोघेच असल्याने घाबरून गेले होते.

संजय वाघमोडे ,राहुल चौगुले यांनी फोनवरून जत परिसरातील यशवंत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावून घेऊन गावकऱ्यांच्या मदती संपूर्ण तीन किलोमीटर परिसरात फिरुन मृत व जखमी बकऱ्यांना शोधून काढले. बंडू चौगुले, अरविंद पडोळकर, नवनाथ सरगर, ग्रामस्थ, शेतमालक, परिसरातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घडलेली घटना अतिशय दु:खदायक आहे हल्यात २२ बकरी बेपत्ता आहेत. वन्य प्राण्यांनी बकरी पूर्णपणे खाल्ल्यानंतर त्या प्राण्याचे अवशेष मिळत नाहीत. पंचनाम्यासाठी वनअधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्यासाठी अवशेष किंवा मृत प्राणी आवश्यक असतो परंतु वन्यप्राण्याने पूर्ण खाऊन फस्त केलेल्या प्राण्याचे अवशेष मिळत नसल्याने अशा प्राण्याची नोंद पंचनामा करताना घेतली जात नसल्याने नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे मेंढपाळ व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरी शासनाने याकडे सहानुभुतीपुर्वक पाहिले पाहीजे.

News Marathi Content