चोरट्याकडून चोरीच्या ८ मोटरसायकली हस्तगत ; करवीर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : चोरीची मोटर सायकल घेऊन फिरणाऱ्या एकास करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.बालिंगा ते खुपिरे रोडवर शनिवारी ही कारवाई करण्यात आली. संभाजी यल्लाप्पा नंदीवाले, (वय ३५, रा. शिंदेवाडी रोड, खुपिरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, २३/०९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या आदेशान्वये करवीर गुन्हे शोध पथक बालींगा, दोनवडे, साबळेवाडी मार्गे खुपिरेकडे जात होते. यावेळी खुपिरे गावच्या दिशेन विना नंबर प्लेटचे मोटर सायकल वरून एक इसम येताना दिसला.त्याला पोलिसांनी हात करून थांबन्यास सांगीतल्यान त्यांने मोटर सायकल थांबवली.नांव व पत्ता विचारता नांव- संभाजी यल्लाप्पा नंदीवाले, वय ३५, रा. शिंदेवाडी रोड, खुपिरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे सांगितले. त्याच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता तो प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. विश्वासात घेऊन विचारपुस केल्यावर त्याने ही मोटरसायकल ८ महिन्यापुर्वी खुपिरे येथील राम मंदिराजवळून चोरी केल्याचे सांगितले.

त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर आणखीन ७ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर आरोपी याने आणखीन काही मोटरसायकलच्या चोरी केल्या असण्याची दाट असल्याने पोलीस त्याचेकडे अधिक चौकशी करत आहेत.

ही कामगिरी ही महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोहेकॉ सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दावणे, रणजित पाटील, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, अमित जाधव, रोहन वाकरेकर, सुनिल देसाई यांनी केली.