जिल्हा परिषद अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 80 हजार मुर्ती संकलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत तब्बल 280051 मुर्ती संकलन तर सुमारे 538 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले होते.

या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपक्रम यशस्वी करणेसाठी तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविणेसाठी सरपंच, सदस्य, व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीव्दारे निर्माण केलेल्या पर्यायी व्यवस्थांमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले.

उपक्रमाची पाहणी करण्यासाठी शिरोली पुलाची,रुई,चंदूर ता. हातकणंगले तसेच ग्रा.पं.जांभळी, टाकवडे व शिरढोण ता. शिरोळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली व मार्गदर्शन केले. यासोबतच जिल्हास्तरावरील खातेप्रमुख यांनी देखील संपर्क अधिकारी म्हणून गावांना भेटी देवून ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

तसेच पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रमोद माने यांनी देखील गावांना भेटी देवून उपक्रम नियोजनाची पाहणी केली व मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, स्थानिक लोकप्रतिनीधी आणि ग्रामसेवक तसेच स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे,ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्यान पर्यावरणपूरक गणेशोत्सव – 2023 अंतर्गत ग्रा .पं. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे उपक्रमांतर्गत मुर्ती संकलन पाहणी वेळी मुख्यकार्यकारीअधिकारी संतोष पाटील उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव प्रकल्प संचालक जल जीवन मिशन माधुरी परीट गट विकास अधिकारी पंचायत समिती,हातकणंगले शबाना मोकाशी तसेच शिरोली पुलाची ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 9921334545