“शाहू” नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे

कागल : शाहू कारखाना,बायो सीएनजी, सौर ऊर्जा, बायो पोटॅश व लिक्विड कार्बन डाय-ऑक्साइडसारखे नवनवीन व नाविन्यपूर्ण उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार असून त्या दिशेने व्यवस्थापनाची वाटचाल सुरू आहे.लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होतील असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले. येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा “शाहू”च्या परंपरेप्रमाणे उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

घाटगे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चातही कारखान्याच्या प्रगतीचा चढता आलेख कायम असून पारितोषिक मिळवण्यामध्येही सातत्य राहिले आहे.केवळसभासद , शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. इथेनॉल प्रकल्पाचे प्रतिदिनी ६०हजार लिटरवरून१लाख८०हजार क्षमतेचे तर सहवीज निर्मिती प्रकल्पाचे२१.५ मेगावॕटवरून ३४मेगावॅट क्षमतेचे विस्तारीकरण यशस्वीपणे चालू आहे.येत्या हंगामामध्ये हे दोन्ही विस्तारीत प्रकल्प वाढीव क्षमतेने चालविनेचा आमचा मानस आहे.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याच्या सध्या सुरू असलेल्या बायोगॅस निर्मिती प्रकल्पामध्ये बदल करून बायो सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्यास आणखी एक उत्पन्नाचा नवीन स्त्रोत्र मिळेल. त्यासाठीच्या मोठ्या भांडवली गुंतवणूकीचा विचार करून कारखाना साइटवर इच्छुकांकडून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.

यावेळी पर्यावरणपूरकरित्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा कारखान्यातच पुनर्वापर करण्यात येणार असलेने दूधगंगा नदीतून पाणी घ्यावे लागणार नाही. तसेच पर्यावरण विभागाच्या आदेशाप्रमाणे यावर्षीपासून कंपोस्ट खत निर्मिती बंद करून त्या ऐवजी स्पेंट वाॕशची निर्गत लावण्यासाठी ड्रायर प्लँटची उभारणी केली आहे.त्यातून शेतीसाठीचे पोटॅश खत तयार करण्यात येईल. ते सभासदांना सवलतीच्या दरात देऊन शिल्लक राहिलेले पोटॅश खत वितरकांमार्फत विक्री करण्यात येणार आहे. कारखान्यास मिळालेल्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कारांबद्दल अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला.

विषय पत्रिकेवरील सर्व विषयास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली सभेस जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक,राजमाता जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.वंदे मातरम् होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली.

स्वागत व श्रध्दांजली वाचन व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले.विषय पत्रिकेचे वाचन, सभासदांचे प्रश्न व सूचनांना कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी समर्पक उत्तरे दिली.सभासदांकडून आलेल्या सूचना व प्रश्नांचे वाचन असि.सेक्रेटरी व्ही.एल.जत्राटे यांनी केले.