सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक

कसबा बावडा – 20-09-2023

श्री सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक

ज्यांनी एका रात्रीत सप्तगंगा कारखान्याचे ६००० सभासद कमी केले आणि कारखान्याचे नावच बदलून कारखाना स्वमालकीचा केला. त्यांनी राजाराम कारखाना आणि पर्यायाने सहकारावर बोलणे हाच मोठा विनोद आहे. त्यांच्या कारखान्याचा वार्षिक अहवाल दाखवा आणि १ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा तसेच आम्ही विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे द्या असे आव्हान आम्ही अनेकदा दिले आहे. त्यानंतर आजअखेर त्यांच्याकडून त्या पाच प्रश्नांची उत्तरे मिळाली नसून कारखान्याचा अहवाल तर सोडाच, अहवालाचे एखादे पान देखील बघायला मिळालेले नाही. केवळ ६०० सभासद शिल्लक ठेऊन कारखाना चालवणाऱ्यांनी राजाराम कारखान्यावर बोलण्याचा प्रकार म्हणजे “सौ चूहे खा के बिल्ली चली हज को ” असाच म्हणावा लागेल.

एकीकडे सहवीज निर्मिती प्रकल्प का उभारला नाही, आधुनिकीकरण का केले नाही म्हणून कोल्हेकुई करायची आणि दुसरीकडे सभासदांच्या डोळ्यात धूळफेक करून अश्या प्रकल्पाना नेहमी विरोध करायचा ही त्यांची कूटनीती राजाराम कारखान्याचे सभासद ओळखत असून ते या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत.

शासनाने यापूर्वीच झोन बंदी उठवली आहे, याची कल्पना कदाचित सतेज पाटलांना नसावी. पोट नियम दुरुस्तीमध्ये समाविष्ट केलेल्या गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यांच्या गावांचा समावेश कार्यक्षेत्रात व्हावा यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती. तसेच मा. आयुक्तसो (साखर), पुणे यांनी सहवीज निर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण करण्याच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देत असताना स्व भाग भांडवल उभारणी बाबत अट नमूद केली असल्याने भाग भांडवल उभारणीसाठी वाढीव शेअर्स करणे आवश्यक आहे.

प्रकल्प उभारणीनंतर वाढीव गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याला भौगोलिकदृष्टया संलग्न असलेल्या नवीन गावांचाच यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सदर यादीमध्ये करवीर तसेच हातकणंगले तालुक्यातील गावेही समाविष्ट असल्याचे आपणाला दिसून येईल परंतु या दोन तालुक्यातील गावांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे आणि कार्यक्षेत्रा लगतच्या सांगली जिल्ह्यातील गावांवर बोलून जाणूनबुजून सभासदांची दिशाभूल करण्यासाठी सतेज पाटील राजकीय हेतूने प्रेरित होऊन टीका-टिप्पणी करत आहेत.

छत्रपती राजाराम महाराजांनी उभारणी केलेल्या या साखर कारखान्याचा कारभार आम्ही सदैव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सेवेच्या विचाराना बांधील राहून करीत असल्यानेच आमचे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. आम्ही निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करताना जास्तीत जास्त अडथळे निर्माण व्हावेत आणि कारखान्याचे विस्तारीकरण होऊ नये तसेच सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गळीत होऊ नये यासाठी आमच्या विरोधकांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांच्या या चुकीच्या प्रयत्नांना कदापीही यश येणार नाही आणि अशा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांची सुज्ञ सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कधीही दखल घेणार नाहीत, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.

मागील ३० वर्षे आम्ही हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राखला आहे आणि इथून पुढच्या काळातही सभासदांच्याच मालकीचा ठेवणार, याचे अभिवचन मी यानिमित्ताने देतो.

🤙 9921334545