कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहाराचे किट देण्यासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करुन जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डी-मार्ट फौंडेशनने ५३८ क्षयरुग्णांना दत्तक घेत ६ महिने पोषण आहार किट पुरवण्यात येणार आहे. यातील पाच किटचे वाटप जिल्हाधिकारी रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात क्षयरुग्णांना करण्यात आले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान सध्या राबवण्यात येत असून याअंतर्गत दानशूर संस्था, उद्योग समुह, व्यक्ती यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यासाठी दत्तक घेवून या अभियानात सहभाग नोंदवावा. डी मार्ट फौंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून याचा प्रत्यय कोविड- १९ साथरोग कालावधीत आला आहे. या संस्थेने ५३८ क्षयरुग्णांना दत्तक घेत समाजासमोर आदर्श ठेवला आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी डी-मार्ट फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करुन जिल्हा क्षयमुक्त होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा असल्याचे सांगितले. स्वेच्छेने निक्षय मित्र बनून दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महेश पवार व लक्ष्मण यादव यांनी डी मार्ट फौंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, माजी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, डी-मार्ट फौंडेशनचे दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख महेश पवार, विभागीय व्यवस्थापक सहदेव पाटील, सहायक व्यवस्थापक लक्ष्मण यादव, शाखा व्यवस्थापक अजिंक्य थोरात, सहायक व्यवस्थापक अमित रोकडे आदी उपस्थित होते.