वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला आहे की, हे कर्ज मिळवण्यात अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती.इंटरसेप्टच्या रिपोर्टनुसार, IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेसोबत शस्त्रास्त्रांचा गुप्त करार करावा लागला.
अमेरिकेने पाकिस्तानकडून शस्त्रे घेतली आणि रशियाशी युद्ध करणाऱ्या युक्रेनला दिली.इंटरसेप्टने लिहिले आहे की, एप्रिल 2022 मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने अमेरिकेच्या इशाऱ्यावरून इम्रान खान यांना सत्तेवरून हटवले. तेव्हापासून पाकिस्तान अमेरिकेचा उपयुक्त समर्थक म्हणून पुढे आला आहे. त्या बदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली.यामुळे पाकिस्तान दिवाळखोर होण्यापासून वाचला आणि सरकारला निवडणुका पुढे ढकलण्यास मदत झाली.
मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटचे आरिफ रफिक यांनी इंटरसेप्टला सांगितले की, पाकिस्तानची लोकशाही युक्रेन युद्धाचा बळी ठरली आहे.पाकिस्तानला शस्त्रे विकून 900 मिलियन डॉलर्स मिळालेपाकिस्तान युद्धात वापरल्या जाणार्या तोफखाना आणि शेल्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच वेळी, युक्रेनमध्ये वर्षभर चाललेल्या युद्धामुळे या शस्त्रांचा मोठा तुटवडा नोंदवला गेला आहे. ओपन सोर्स वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये बनवलेली शस्त्रे युक्रेनकडून युद्धात वापरली जात आहेत.मात्र, अमेरिकेने किंवा पाकिस्तानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
इंटरसेप्टला 2022-23 मध्ये पाकिस्तानने विकलेल्या शस्त्रास्त्रांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यावर अमेरिकेच्या ब्रिगेडियर जनरलच्याही स्वाक्षऱ्या आहेत. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील हा करार ग्लोबल मिलिटरी प्रॉडक्ट्सने केला होता.