त्या झारीतील शुक्राचार्याकडून मराठा आरक्षणास खो, राजू शेट्टी

जालना : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मराठा आरक्षणाला खो घालण्याचा प्रयत्न राज्यातील काही जण करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते अंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या १४ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीच्या राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात ९० टक्के मराठा समाज हा शेतकरी आहे. वर्षानुवर्षे तो तोट्याची शेती करून पिचलेला आहे. सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. त्याचा सर्वाधिक फटका मराठा समाजालाच बसलेला आहे. सन २०११ साली मराठा समाजाला आरक्षण द्या, ही मागणी मी संसदेत सर्वप्रथम केली.

सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील असो राज्यातील काही झारीतील शुक्राचार्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. आरक्षण मिळू नये म्हणून काहीजण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. काहीजण कोर्टात ठाण मांडून बसलेले आहेत. पण मराठा समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या मागणीची दखल राज्यकर्त्यांनी घ्यावी, अन्यथा हा समाज राज्यकर्त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाचा हक्काचे आरक्षण दिले गेले पाहिजे. आरक्षण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सरकारला एखादा निर्णय घ्यायचे असेल तर रातोरात अद्यादेश काढून निर्णय घेतले जातात. मग यासाठी का वेळ घेतला जात आहे. मराठा समाजातील योध्दे या मागणीसाठी जीव पणाला लावून आरक्षणाची मागणी करत आहेत.. समाजासाठी व चळवळीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे योध्दे शतकातून एखादे तयार होतात. तरीही सरकार बण्याची भूमिका घेत असेल तर सरकारच्या भूमिकेबद्दलच संशय निर्माण झाला आहे. आरक्षणाचा सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा या आंदोलनाचे वणव्यात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही.