आजऱ्यातील भाजप कार्यालय निष्ठावंतांनी केले बंद

आजरा : शहरात असणारे तालुक्यातील भाजप कार्यालय पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच बंद केले. हा निर्णय जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांना चिंतन करायला लावणारा आहे.

ज्या आजरा तालुक्यात भाजपाचे अस्तित्व नव्हते अशावेळी पक्षाचे निष्ठेने काम करत तालुक्यात पक्ष रूजविला मात्र त्याच जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांचीच होत असलेली मुस्कटदाबी आता पक्षाला भारी पडणारी आहे. वरिष्ठांना अनेकदा कल्पना देऊनही जाणिवपूर्वक केलेले दुर्लक्ष महागात पडणार आहे.अनेक वर्षाच्या मुस्कटदाबीने अखेर कार्यकर्त्यांनी राग व्यक्त करत चक्कं कार्यालयच बंद केले.

सुमारे १०० जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा कठोर निर्णय घेतला असून लवकरच ते पुढील दिशा ठरवणार आहेत.या निर्णयाने पक्षाची तालुक्यात पिछेहाट होणार आहे. यावेळी प्रा.सुधीर मुंज, सुधीर कुंभार, अरुण देसाई, नाथ देसाई, सचिन इंदुलकर,भास्कर बुरुड, महेश नार्वेकर,गुरु टोपले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.