शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ; या दोन चित्रपटांनाही टाकले मागे

मुंबई : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे ‘जवान’ची जादू पाहायला मिळत आहे. शाहरूखचे चाहते सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रत्येकजण चित्रपटाचे कौतुक करत आहे.अनेक गंभीर विषयांवर हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटातील संवादांवर प्रेक्षक शिट्ट्या वाजवत आहेत आणि गाण्यांवर थिएटर्समध्येच थिरकत आहेत. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते, अशातच आता आकडेवारी समोर आली आहे.

जवानने भारतात ग्रँड ओपनिंग केली आहे. ‘जवान’च्या पहिल्या दिवसाच्या कमाई ‘पठाण’, ‘गदर २’ अशा अनेक ग्रँड ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.’सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘जवान’ने पहिल्या दिवशी भारतात ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६५ कोटी हिंदीमध्ये, तर प्रत्येक ५-५ कोटी तमिळ आणि तेलुगूमध्ये व्यवसाय केला. चित्रपटाची क्रेझ पाहता ‘जवान’ ग्रँड ओपनिंग करेल, असे अंदाज वर्तवले जात होते. ते खरे ठरले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवनवीन विक्रम रचेल, असं म्हटलं जातंय.शनिवार व रविवारी चित्रपटाला वीकेंडचा फायदा होईलच. शिवाय अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातूनही चित्रपटाने दमदार कमाई केली होती. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी त्याच्याच ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला असला तरी एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत तो ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.