
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी बैठक पार पडणार आहे.
इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. याआधीच्या दोन बैठका अनुक्रमे बिहारच्या पाटणा आणि कर्नाटकमधील बंगळुरु या शहरांमध्ये पार पडल्या आहेत. इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीला अद्याप सुरुवात व्हायची आहे, त्याआधीच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून तीन नावं समोर आली आहेत. सर्वात पहिलं नाव चर्चेत आहे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं. त्यानंतर काही तासातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही नाव चर्चेत आलं आहे. तर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव चर्चेत आहे.