
कोल्हापूर: आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने एक लाखाहुन अधिक राख्या पोस्टातून थेट सीमेवर पाठवण्यात आल्या. कोल्हापूर पोस्ट विभागाचे हेड पोस्ट मास्टर प्रसाद तेरे देसाई तसेच डेप्युटी पोस्ट मास्टर स्मिता जाधव यांच्याकडे ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मगदूम यांच्या हस्ते संकलित राख्या मुख्य पोस्ट ऑफिस येथे सुपूर्त करण्यात आल्या.
प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी आझाद हिंद ट्रस्टने “राष्ट्र रक्षा बंधन” या उपक्रमात संकलित केलेल्या राख्या सीमेवरील जवानांना पोहचवण्यासाठी पोस्ट ऑफीस अति जलद सेवा देऊन सैनिकांना लवकरच पोहच करतील असे ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांना आश्वासित केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मगदूम म्हणाले कसबा बावडा येथे या उपक्रमाची सुरुवात झाली होती. त्याचे अनुकरण विविध संस्था करत असल्याने हा उपक्रम सर्वदूर पोहोचत आहे. पोस्ट ऑफिसमुळे या राख्या थेट सीमेवरील जवानांना मिळत असल्याचे सांगितले.नेहमीच पोस्ट ऑफिसचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
या राख्या कोल्हापूर शहर, करवीर, गारगोटी भुदरगड, राधानगरी, कागल, इचलकरंजी,गडहिंग्लज, तसेच कराड सातारा,पुणे, चिंचवड, मुंबई , पालघर आदी भागातून संकलित करण्यात आल्या. कोकण विभागातून दापोली,रत्नागिरी सिंधुदुर्ग, आदी भागातून मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यात आल्या होत्या.
यासाठी ट्रस्टचे सदस्य प्राध्यापक संदीप वारके यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सारिका जाधव, जयश्री रेडेकर, पुष्पा उरणकर, कांचन निळकंठ, मौसमी बापट,वृषाली मगदूम,नेहा मगदूम,पूजा खाडे-ढेरे, आर्या जाधव,विजय सिदाम, रोहित शिंगे, अतुल नींगुरे, सुनील मुळे, समील माने शरद पाटील, अजित गोरे,सुनील अठे विठ्ठल येडगे, तृप्ती पोवार, संगीता नलावडे, वृषाली कांबळे,सुप्रिया रेंदाळे, रणजीत माळी, अभिजीत पवार, श्रुती नलवडे, गुलाब चौगुले आदी उपस्थित होते.