बहीण भावाच नात ‘नोक झोक वाला प्यार ‘

असित बनगे : कोल्हापूर

आज रक्षाबंधन.बहिण भावाचं नातं प्रफुल्लित करणारा आपल्यासाठी आपलं म्हणाव अस कोणीतरी आहे याची जाणीव करून देणारा हा सण.

बहिण भावाचं नातं हे दुसऱ्या कोणत्याही नात्यापेक्षा वेगळं आणि अनोखं असतं. बहीण मोठी असो वा लहान किंवा भाऊ मोठा असो वा लहान दोघांसाठीही हे नातं कायमच स्पेशल असतं.कधी भांडण, कधी नाराजी, कधी काही चुकलं तर घरच्यांना न कळू देता कानशिलात लगावणारी पण बहीणच आणि काही चांगलं घडलं तर त्या हाताने प्रेमळ माया करणारी पण बहीणच असते.मलाही मोठी बहीण आहे, दीदी म्हणतो मी तिला. ताई या शब्दापेक्षा दीदी या शब्दातूनच बहीण भावाचं नातं घट्ट होतं असं मला वाटतं.माझ्या दीदीचं लग्न झालंय आता. साडेतीन वर्षाचा भाचाही आहे मला. लग्ना आधी काही ना काही कारणावरून सतत आमच्या खटके उडायचे. नुसती भांडण. भांडण काय नुसती हाणामारी ! एक क्षणही आमचं पटायचं नाही, रोज भांडण. २०१९ ला मम्मी गेली, पाठोपाठ २०२० मध्ये साधारण ८ -९ महिन्याच्या कालावधीत पप्पाही गेले. पण त्यावेळी मला धीर देणारी सांभाळून घेणारी होती ती माझी दीदी.पप्पा कोरोना काळात गेले. सगळं काही बंद असल्यान तिला पप्पांच्या अंत्यसंस्कारालाही येता आलं नाही. मला तर काहीच सुचत नव्हतं. पण एका फोनवर ‘असित पप्पा- मम्मी नाहीत म्हणून काय झालं मी आहे की’ असं म्हणून मला सावरणारी होती ती माझी दीदी. नुसतच बोललीच नाही तर दीदी – भाऊजींनी गेली चार-पाच वर्षे माझा अक्षरशः मुलाप्रमाणे सांभाळ केलाय. माझं दुखणं खुपण, ग्रॅज्युएशन नंतरच माझं जर्नलिझम मध्ये मास्टर्स करण सगळं त्यांनी बघितल. भाऊजींनीही कधी मला पप्पांची उणीव भासू दिली नाही. तेही सतत मला म्हणतात तुला काय करायचे ते कर. अजून शिकायचंय शिक ,इतक्यावरच थांबू नकोस. आज मम्मी पप्पा नाहीत पण त्यांची कमी मला या दोघांनी कधीही भासू दिली नाही. क्षणाक्षणाला भांडणारे आम्ही आज तीच दीदी माझी आई बनली आहे. असं म्हणतात की भाऊ बहिणीची रक्षा करतो पण इथं माझी बहीण माझी आजपर्यंत रक्षा करत आली आहे. असंच असतं बहीण भावाचं नातं कधी ‘रोक – टोक तर कधी नोक – झोक वाला प्यार.