शियेच्या ग्रामसभेत जलजीवन योजनेच्या वाढीव कामांसह विविध विषयांना बहुमताने मंजुरी

शिये: जलजीवन योजनेचे काम योग्य प्रकारे सुरू असून उर्वरित वाढीव कामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी शिये ( ता. करवीर ) ग्रामसभेत बहुमताने मंजूरी दिण्यात आली.

त्याचबरोबर चर्चेतील अनेक विषय ग्रामसभेसमोर मांडत या सर्व विषयांना बहुमताने मंजूरी मिळाली.१५ ऑगस्टची विशेष ग्रामसभा सोमवारी २८ रोजी झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी हनुमान विकासचे चेअरमन जयसिंग काशिद हे होते. सरपंच शितल मगदूम, छ. राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव, माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हे प्रमुख उपस्थित होते. १५ व्या वित्त आयोगातील नीधीचा गैरव्यवहार, जलजिवन योजना, यशवंत बार आशा विषयांवरुन शेतकरी संघटनेने ग्रामसभेसमोर स्पष्टीकरण मागितले. १५ व्या वित्त आयोगातील गैरव्यवहार या विषयावर ग्रामविकास अधिकारी यांनी खुलासा करत संबंधित अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी सुरू असून चौकशीत ते दोषी आढळल्यास कारवाईचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यामुळे सद्या संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी दाखल करणे आपल्या अधिकार कक्षात नसल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश कुंभार यांनी स्पष्ट केले. जलजीवन योजना संपूर्ण गावासाठी आवश्यक असल्याने त्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळे या योजनेच्या कामावरून गावाची बदनामी थांबवावी आणि वाढीव कामाला विनाविलंब मंजूरी देण्यात यावी यासाठी सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच यशवंत बारला दिलेले दाखले हे तत्कालीन सरपंच रणजीत कदम यांच्या कार्यकाळात दिलेले आहेेत. असा खुलासा माजी सरपंच रणजीत कदम यांनी या ग्रामसभेसमोर केला. त्यामुळे बोगस दाखल्याच्या आधारे यशवंत बार सुरू झाला असा आरोप करणार्‍यांनी दुरुस्ती करावी असे कदम यांनी स्पष्ट केले.

याला माजी सरपंच विश्वास पाटील व माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी ग्रामसभेसमोर दुजोरा दिला.याशिवाय महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी पांडूरंग पाटील यांची निवड कायम ठेवत समिती सदस्यांमध्ये काही फेरबदल करायचे झाल्यास त्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले.विषय पत्रिकेवरील व आयत्या वेळचे सर्व विषय ग्रामसभेचे अध्यक्ष जयसिंग काशीद यांनी बहुमताने मंजूर असल्याचे जाहीर केले.यावेळी उपसरपंच प्रभाकर काशीद, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, मारुती जाधव, व्यंकट पाटील, उत्तम पाटील, अक्षय पाटील, लक्ष्मण काशीद, चंद्रकांत जाधव, किरण चौगले, शहाजी काशिद, जयसिंग पाटील, मच्छिंद्र मगदूम, आनंदा पाटील, एम. डी. पाटील, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.