श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामांचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारत येथे स्वच्छतागृह इमारत व दक्षिण (विद्यापीठ हायस्कूल) दरवाजा वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते याचठिकाणी सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.45 वाजता होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून ‘पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम’ अंतर्गत भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारत येथे सुमारे 83 लाख 8 हजार रुपयांच्या निधीतून स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.

या निधीतून स्वच्छतागृहासाठी आवश्यक बाबी पुरवण्यात आल्या असून यामुळे भाविकांची व पर्यटकांची सोय होईल. श्री महालक्ष्मी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे. सध्या असणारे विनापरवानगी व खाजगी चप्पल स्टॅन्ड मंदिराच्या भिंतीलगत असून ते पुरातत्व वास्तूंबाबतच्या नियमास धरुन नाही तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगानेही चप्पल स्टॅण्ड मंदिरापासून दूर असणे आवश्यक आहे. तसेच ही सुविधा अपुरी पडत असल्यामुळे मंदिरापासुन दूर व विनामुल्य चप्पल स्टॅन्ड सुविधा पुरविणे आवश्यक असल्याची संकल्पना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडली होती. त्यानुसार देवस्थान व्यवस्थापन समितीकडून श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी विद्यापीठ हायस्कूल दरवाजा नजिक वाहनतळ परिसरात चप्पल स्टॅण्ड सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

या सुविधा केंद्राच्या उभारणीमध्ये छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, कोल्हापूर यांची परवानगी तसेच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व त्यांच्या सर्व कुटूंबियांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने छत्रपती परिवाराला धन्यवाद दिले आहेत. या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी देवस्थान समितीमार्फत 11 लाख 78 हजार रुपये खर्च झाला आहे. हे सुविधा केंद्र देवस्थान समितीकडून चालवण्यात येणार असून भाविकांना चप्पल ठेवण्यासाठी विनामुल्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भविष्यात श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे सुविधा केंद्रास विनामुल्य सेवा देण्याकरता स्वयंसेवकांनी तयारी दर्शवल्यास त्यांना सेवा करण्याची संधी देवस्थान समितीकडुन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिली आहे.

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील पायाभूत विद्युत सुविधांचे महावितरणकडून नुतनीकरण करण्यात येत असून परिसरातील विद्युत जाळे भूमिगत करण्याचे काम सुरु आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या 1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून महालक्ष्मी मंदिर परिसराच्या सुशोभिकरण अंतर्गत विद्युत सुविधा नूतनीकरण व उपरी विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. हे कामही लवकरच पूर्णत्वास येणार असून ते झाल्यानंतर श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर आणखी सुशोभित व सुरक्षित होईल.

🤙 8080365706