सहा तालुक्याच्या नेते मंडळींची समन्वय बैठक घ्या: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: दूधगंगा नदीवरील सुळकुड (ता.कागल ) येथून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रस्तावित पाणी योजनेसंदर्भात येत्या 11 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानुषंघाने मंत्रालयातील बैठकीपूर्वी या योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी दूधगंगा बचाव सहा तालुक्याच्या सर्वपक्षीय नेतेमंडळींची समन्वय बैठक घ्या जेणेकरून या योजनेला एकत्रित विरोधाची धार मिळेल व ही योजना रद्द करण्यासाठी यश मिळेल . कृती समितीने आज राजे समरजीतसिंह घाटगे यांची भेट घेतली त्यावेळी चर्चा करताना ते बोलत होते.

या योजनेच्या विरोधात कागल तालुक्यातील दूधगंगा नदी काठावरील जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ही योजना रद्द करावी या मागणीसाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांही दिवसांपूर्वीच निवेदन दिले होते.

निवेदनातून तसेच त्यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेतुन आपण स्थानिक भूमिपुत्रांच्या या योजने विरोधातील तीव्र भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.त्याची दखल घेऊन येत्या अकरा तारखेला या योजनेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे घाटगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, सुळकूड पाणी योजना हा फक्त कागलकरांसाठीचाच विषय नसून आसपासच्या सहा तालुक्यांचा विषय आहे. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, शिरोळ, निपाणी सीमाभागातील काही भाग या सहाही तालुक्यांसाठी हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या भागातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करायला हवेत. पक्ष, गट-तट न पाहता, सत्तेवर असणार्‍या-नसणार्‍या प्रत्येक लोकप्रतिनिधीने या लढ्यासाठी साथ द्यायला हवी आहे. 11 तरखेपूर्वी सर्व नेत्यांची समन्वय बैठक झाल्यास योग्य तो निर्णय घेण्यास मदत होईल. आपल्या हक्काचे पाणी वाचवण्यासाठी आता लवकरात लवकर ठोस पावले उचलावी लागणार आहेत. मी त्यासाठी सज्ज आहे. या माध्यमातून मी या सहाही तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करतो की, आपण सर्वांनी या लढ्यात एकत्रित यावे असेही ते म्हणाले

यावेळी कृती समितीतील एम पी पाटील धनराज घाटगे, सागर कोंडेकर, कैलास जाधव, अमोल शिवई, मनोज कोडोले, शरद धुळूगडे, अविनाश मगदुम,युवराज पाटील, बाबाय्या स्वामी, विनायक आवळे, चंद्रकांत पाटील, बाळासो पाटील, अरुण मुद्दाणा, भगवान चवई, महादेव पर्वते, चंद्रकांत धमांना, सुहास लगारे शिवाजी मगदुम उपस्थित होते.