मुदाळ तिट्ट्यावरील उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : बिद्री- मुदाळ तिट्टा मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणी मुदाळ तिट्टा- बोरवडेच्या व्यापारी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन व्यापारी आणि दुकानदारांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना दिले. हा उड्डाणपूल रद्द करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर मंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या या निवेदनावर ५० व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे, हा उड्डाणपूल मुदाळ तिट्टा येथे झाल्यास व्यापारी पूर्णपणे कोलमडून जातील. व्यापाऱ्यांसह छोट्या -मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक हानी होऊन संसार उध्वस्त होतील. मुदाळ तिट्ट्यावर होणारी वाहतुकीची कोंडी गेल्या एक वर्षापासून अधिक वाढली आहे.

सिमेंट रस्त्यांचे संथगतीने होणारे काम, अर्धवट स्वरूपातील रस्ते तसेच; दर रविवारी अमावस्येला आदमापूर येथे होणारी भाविकांची गर्दी यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे. उड्डाणपुलापेक्षा वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवावेत. तसेच; एसटी व प्रवासी वाहतुकीसाठी मुख्य चौकापासून चारही मार्गांवर ५० मीटरवर प्रवासी थांबे करावेत. वाहतूक पोलीस नेमावेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, बाळासाहेब बलुगडे, श्रीकांत निकम, पंडित पाटील, मिलन फराकटे, रणजीत पाटील, संदीप रहातेकर, बबन पाटील, सुनील डौर, संजय बलुगडे, समिर मुल्ला, राहुल देसाई, सरफराज बागवान, सतीश कळमकर, सुनिल बलुगडे आदी प्रमुख उपस्थित होते.