तमाशा कलावंत शांताबाई यांना पाच लाखांचा धनादेश

शिर्डी : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

शिर्डी येथे झालेल्या शासनआपल्यादारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृद्धापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांताबाईंचे पुनर्वसन करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे-कोपरगावकर यांची द्वारकामाई वृद्धाश्रम येथे भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. वृद्ध कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गत सन- २००९ पासून त्यांना वर्ग ‘क’ कलाकार म्हणून दर महिन्याला २२५० रुपये मानधनही देण्यात येत आहे.