
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. त्यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा बालेकिल्ला आहे. मात्र, पवार बीडमध्ये धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी या मतदारसंघात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांची दुपारी सभा सुरू होईल. त्यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माने चौकात दुपारी 12 वाजता सभा होणार आहे. त्यापूर्वीच बीडमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक बबन गित्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते यांचं बीडमध्ये मोठं प्रस्थ आहे. ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. मात्र, मुंडे मंत्री असूनही गित्ते यांनी त्यांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.