कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.
वारणावती भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. हा सौम्य प्रकारचा भूकंप असून तो फक्त वारणावती आणि धरण परिसरातच जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चांदोली धरणाजवळ होता. चांदोली धरणाच्या सुरक्षिततेला भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचे सहाय्यक अभियंता (वर्ग एक) मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले आहे. कोल्हापूरपासून १७.१९ अक्षांशावर याची नोंद झाली असून याची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती.