वन संरक्षण आणि वन्य जीवांच्या त्रासातून मुक्ततेसाठी एकात्मिक उपाययोजना राबवावी – डॉ. चेतन नरके

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके हे डोंगराळ असून, येथे वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.तसेच येथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. याकरिता जिल्ह्यातील वन संरक्षणासोबत , वन्यजीव प्राण्यांच्या त्रासातून होणाऱ्या नुकसानीसाठी एकात्मिक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी वन मंत्री सुधीर मूनगुंटीवार यांच्याकडे केली.

त्याच बरोबर पिक-पाण्याची नोंद शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर योग्य पद्धतीने न झाल्याने नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. यासाठी जी.पी.एस. प्रणालीद्वारे पीक – पाण्याची नोंद करावी , अशी मागणी त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.डॉ. चेतन नरके लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी तसेच उद्योजकांच्या गाठी भेटी घेत आहेत.यावेळी चंदगड, आजरा, शाहुवाडी, राधानगरी, गगन बावडा तसेच पन्हाळा या डोंगराळ तालुक्यातील दौऱ्याच्या वेळी शेतकरी आणि दुध उत्पादकांनी त्यांच्या समस्या मांडल्या.यामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. तसेच वन्य जीवांच्या हल्ल्यात शेतकऱ्याना गंभीर दुखापत होते .तसेच प्रसंगी मृत्य देखील होत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून यासाठी एकात्मिक उपाययोजनेची गरज आहे. गवा, रानडुक्कर, हत्ती यांचा नैसर्गिक अधिवास व त्यांच्या सवयीचा विचार करून त्याच्या वर्गीकरणानुसार उपाययोजना करावी. जंगलातच त्यांना त्यांच्या खाण्याची सोय केली, तर ते मानवी वस्तीत येणार नाहीत. याकरिता शासन पातळीवर प्रयत्न व्हावेत. याबरोबरच वन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी डॉ.चेतन नरके यांनी वन मंत्री सुधीर मूनगुंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

🤙 9921334545