धरणग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार – राजे समरजितसिंह घाटगे

कागल : धरणग्रस्तांच्या त्यागातून काळम्मावाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील भाग सुजलाम सुफलाम झाला. मात्र धरणग्रस्तांचे काही प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे. त्यांचे हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी धरणग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कसबा सांगाव येथील वाडदे व वाकी धरणग्रस्त वसाहतीस भेटीवेळी धरणग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्थापत्य व पुनर्वसन अभियंता मनीषा इंगवले,पाटबंधारे विभागाचे नितीन पाटील, तलाठी दिगंबर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धरणग्रस्त नागरिकांनी त्यांच्या व्यथा पोटतिडकीने मांडल्या व त्या सोडवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी पुढाकार घ्यावा. असे साकडे घातले. घाटगे पुढे म्हणाले, स्व राजे साहेब यांच्या अमृत महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने राबविलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय योजनांचे लाभ गटतट न पाहता कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त लोकांना पारदर्शकपणे मिळाले पाहिजेत. अशी राजे साहेबांच्या कामाची पद्धत होती. त्यानुसार हा उपक्रम राबवून त्यांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले आहे.दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत व्यापक बैठक झाली होती. त्यानंतर प्रशासन पातळीवर सकारात्मक पावले उचलण्यात आली.

बाबुराव पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यावेळी ठरल्याप्रमाणे वसाहतींच्या दौऱ्याचे नियोजन लांबले. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यास धरणग्रस्त मुकले आहेत. त्यामुळे केवळ धरणग्रस्तांचेच नव्हे तर आपल्या सर्वांचेच नुकसान झाले आहे.त्यांच्या पश्चात धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.धरणग्रस्तांना आमच्या पूर्वजांनी जमीनी दिल्या पण धरणग्रस्तांच्या नावावर जमिनी करण्याचे त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत.अशी ग्वाही घाटगे यांनी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शंकराव चव्हाण उपाध्यक्ष बाळू शिंदे विष्णू पताडे नंदकुमार पाटील विठ्ठल चव्हाण अशोक झंजे सहभागी झाले. यावेळी बाबासो मगदूम लखन हेगडे विजय घाटगे आप्पासाहेब पाटील मनोज कडोले बापू शेटे मारुती पाटील श्रावण पाटील बबन पाटील विठ्ठल चव्हाण बाबुराव चव्हाण वसंत पाटील यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

बैठकीतूनच थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना घाटगेंनी केला फोन

यावेळी धरणग्रस्तांनी शेत रस्त्यासह सात बारा पत्रिकेत नाव नोंद करणे प्रॉपर्टी कार्ड मिळणे वसाहतीची हद्द निश्चित करणे अतिक्रमण काढणे नागरी सुविधा पुरवणे नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशा विविध विषयावर घाटगे यांच्यासमोर गा-हाणे मांडले. त्यावर घाटगे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना बैठकीतूनच फोन लावला व जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली.