दिव्यांगांसाठीच्या शिबिराचे नियोजन करा- निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

कोल्हापूर: दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत कोल्हापूर मध्ये 25 ऑगस्ट रोजी एक दिवसीय शिबिर घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी दिव्यांगांसाठी आयोजित या शिबिराचे चोख नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे लाभ दिव्यांगांना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात घेण्यात आली. यावेळी गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुटकेकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अमेय जोशी, नॅशनल ट्रस्ट चे सदस्य अतुल जोशी तसेच समिती सदस्य उपस्थित होते. तेली म्हणाले, ‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ विशेष अभियानांतर्गत घेण्यात येणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करा. याठिकाणी 40 हून अधिक स्टॉल्स लावण्यात येणार असून यामधून दिव्यांगांना विविध विभागांच्या योजनांची माहिती व लाभ द्यावा. शिबीर स्थळी दिव्यांगांची बैठक व्यवस्था, लाभार्थ्यांची निवड, त्यांची वाहतूक व्यवस्था, नोंदणी व्यवस्था करण्याबरोबरच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा द्याव्यात. नोंदणीवेळी एकाच ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी योग्य ती व्यवस्था करावी.प्रिया पाटील म्हणाल्या, दिव्यांगांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत तरतुदी नुसार दोषींवर कारवाई केली जाते. या अधिनियमान्वये पोलीस विभागामार्फत दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या सहकार्याबाबतची माहिती शिबिरात देण्यात येईल. समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी शिबिराच्या नियोजना बाबत माहिती दिली.