शिरोळ गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : उदगाव तालुका शिरोळ येथील गट नंबर 1662 या निवासी भागातील कारखाने हटवण्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. चुकीचे काम करणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला पाठीशी घालने तसेच वरिष्ठ कार्यालयीन पत्रांचा अवमान करणे. अशा चुकीच्या पद्धतीने काम करणारे शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक गंगाधर गाडे व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गोंडाजे यांनी जिल्हा परिषद समोर आज (गुरुवारी) लाक्षणिक उपोषण केले.

उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे तक्रारीचे निवेदन दिले असून त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे,की सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी बी.बी सूर्यवंशी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. सूर्यवंशी हे 31 मे 2020 रोजी निवृत्त होणार असल्याची माहिती असताना सुद्धा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी जाणीवपूर्वक वरिष्ठ कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष करून सुनावणी घेतली नाही. कोट्यावधीच्या खुल्या जागा हातातून घालवणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्या सूर्यवंशी यांना त्यांनी पाठीशी घातले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी या निवेदनात म्हटले आहे.

उदगाव तालुका शिरोळ येथील गट नंबर 1662 हा रहिवासी भाग आहे यामध्ये महालक्ष्मी कॉलनीमध्ये शासकीय आदेश अटीशतीचा भंग करून तिथे कारखाने सुरू आहेत. याबाबत वेळोवेळी शासकीय कार्यालयाकडे करारी करून देखील अद्याप येथील कारखाने बंद करण्यात आलेले नाहीत. वरिष्ठ कार्यालयाच्या पत्राचा अवमान तसेच आदेश पत्राची अंमलबजावणी न करणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान सायंकाळी पाच नंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून उपोषणकर्त्यांना संबंधित तक्रारीबाबत 30 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले. त्या नंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.