राज्यात मान्सून सक्रिय

मुंबई : बळीराजासाठी समाधानकारक बातमी समोर आले आहे. महाराष्ट्राच्या हवामानात बदल होत असून चौहीकडे मान्सून सक्रीय होत असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आता बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यातून मान्सून गायब झाला आहे. त्यानंतर आता कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील एक ते दोन दिवसांत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.