
हैद्राबाद :- शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतीमालावरिल निर्यातबंदी कायमची रद्द करणे, दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकणे, आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे, पाटपाण्याला लावलेला पाझर कर रद्द करणे आणि गौण खनिजावरिल वसुली थांबविणे असा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्याची तयारी बी. आर. एस. चे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दाखविली.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष अॅड.अजित काळे, शिवाजी नांदखिले यांनी 29 जुलै 2023 रोजी हैद्राबाद येथे के. सी. आर. यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शंकर आण्णा धोंडगे आणि बी. जे. देशमुख उपस्थित होते.खरिप आणि रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 10 हजारांचे अनुदान, शेतकऱ्यांना नैसर्गिक मृत्यूनंतर पांच लाख रुपये रोख मदत, आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीची सुमारे 7500 खरेदी केंद्राची व्यवस्था तसेच दलित बंधु योजनेअंतर्गत 10 लाखाचे अर्थसाह्य तेलंगणा राज्यात दिले जाते. शेती आणि पिण्याचे पाणी मोफत दिले जाते, शेतीसाठी वीज मोफत असल्याने तेलंगणात शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत असा दावा के. सी. आर. यांनी चर्चेदरम्यान केला. रघुनाथदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गंभीरपणे प्रदीर्घ चर्चा केली.
