
पुणे : लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला.

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे.
