‘सीपीआर’ मधील ओपीडी दोन सत्रात सुरू करा : निलेश सुतार

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील ओपीडी दोन सत्रात सुरू करावी आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, या मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता आरती घोरपडे यांना दिले आहे.

यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार म्हणाले, सीपीआर रुग्णालय हे कोल्हापूरच्या जनतेसाठी अत्यंत लाभदायक रुग्णालय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गरजू कामगार ,शेतकरी ,ग्रामीण तसेच शहरी कुटुंबातील हजारो लोक लाभ घेत असतात. चंदगड, राधानगरी ,दाजीपूर ,शाहूवाडी हे तालुके जिल्हा रुग्णालयापासून 80 ते 100 किलोमीटर अंतरावर आहेत. रुग्णालयात येणारे रुग्ण एसटीने प्रवास करून किंवा खाजगी प्रवास करून येतात. यामध्ये किमान दोन तास जातात.इथे किमान दोन ते तीन तास केस पेपर काढण्यासाठी लागतात. त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी फरफट होते. रुग्णांना किमान आठ ते दहा वेळा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात.सध्या चालू असणारी ओपीडी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आहे. परंतु येथील अधिकारी दहा ते अकरा वाजेपर्यंत येतात व साडेबारा वाजता निघून जातात. अधिकारी फक्त दोन तास काम करतात आणि लाखो रुपयांचा पगार घेऊन कोल्हापूरच्या जनतेची आणि प्रशासनाची फसवणूक करतात, असा आरोपही सुतार यांनी केला आहे.

वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ओपीडीचे दुसरे सत्र 2 ते 5 या वेळेत सुरू करावे.यामुळे कोल्हापूर मधील विविध तालुक्यातील येणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल व रुग्णांची होणारी फरकट थांबेल.येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.यावेळी महानगराध्यक्ष अभिजीत भोसले , जिल्हा सचिव मदन परीट ,सचिन गुरव ,अमोल निकम, महेश गुरव ,दर्शन शहा ,सर्जेराव कोंडेकर,सुदेश मनोलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706