
कोल्हापूर : गडहिंग्लजमधील अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केलीय.

आणखी दोघांचा अद्याप शोध सुरु आहे. दरम्यान, संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्यान संताप व्यक्त होतोय. दरम्यान ही घटना घडल्यापासून शुभदा पाटील आणि राहुल राऊत हे दोघेही फरार होते. रविवारी रात्री गडहिंग्लज पोलिसांनी त्यांना सोलापूरमधून अटक केली. आज न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात खाद्यतेल, बेकरी उत्पादनात नामांकित समूह असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली. आधी विषारी औषध प्राशन करून त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून शिंदे यांनी आपल्यासह पत्नी आणि मुलाचे जीवन संपवलं. शनिवारी सकाळी शिंदे यांच्या बेडरूमचा दरवाजा उशिरापर्यंत न उघडल्यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला.
