
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. मात्र पवारांना मिळालेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी मी स्वतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
