भावना गवळी यांची डोकेदुखी वाढणार

वाशिम : लोकसभा निवडणुका पुढच्यावर्षी होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भावना गवळी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्वच पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमदेवारांची चाचपणी करत आहेत. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख इच्छूक असून त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. येत्या 11 तारखेला संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने काल वाशीममध्ये पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता वाशिम-यवतमाळमध्ये भावना गवळी विरुद्ध संजय देशमुख असा सामना रंगलेला दिसणार आहे.