
बंगळूर : कर्नाटकात सरकार स्थापनेपूर्वी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात काँग्रेस हायकमांडने ‘सत्तावाटप किंवा रोटेशनल सीएम’ व्यवस्थेची तजबीज केल्याची अटकळ असतानाच सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे विधान वरिष्ठमंत्री एम. बी. पाटील यांनी केले.

त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. अडीच वर्षांनी किंवा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारमुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, या सत्तावाटपाच्या चर्चा आणि अटकळ नाकारत मंत्री एम. बी. पाटील यांनी सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले. या विधानावर शिवकुमार यांनी प्रतिक्रिया द्यायची टाळली; मात्र हायकमांड याची काळजी घेतील, असे शिवकुमारांचे भाऊ आणि बंगळूर ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश यांनी सांगितले.
