‘बांबूची हक्काची बाजारपेठ कधी?; गगनबावडा तालुका वासीयांचा सवाल

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज’

बांबू ‘ठरतोय जगण्याचा आधार

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे

शेती हा धामणीतीरावरील लोकांचा प्रमुख व्यवसाय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या पशुपालनाबरोबरच धामणी खोरीतील भूमिहीन ,शेतमजूर , सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा आधार ठरत आहे ती बांबू काठी. मोठ्या प्रमाणात गगनबावडा तालुक्यात बांबूचे उत्पादन होत असल्याने बाजारपेठेची उपलब्धता तालुक्यात उपलब्ध करून दिल्यास ने – आन करण्याचा प्रश्न सुटून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्यास मदत होणार आहे. पण सध्या लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गगनबावडा तालुक्याला हक्काची बांबूची बाजारपेठ केव्हा उपलब्ध होणार? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.बांबूला ग्रामीण भाषेमध्ये चिवा असं म्हटलं जातं. मृगाचा पाऊस पडण्या अगोदर खोरीतील बहुतांशी शेतकरी बांबू तोड करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना भेटून चिवा काठीचा आर्थिक व्यवहार करतात. त्यानंतर कामगार लावून तोड केली जाते व ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या वाहनातून कोल्हापूर येथील शाहू मार्केट मध्ये विक्रीसाठी आणला जातो. मंगळवारीआठवडी बाजार भरतो. सोलापूर ,सांगली ,मराठवाडा भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात बांबू खरेदी करतात. दलालामार्फत व्यवहार केला जातो.

कधी कधी थेट शेतकरी धामणी खोरीमध्ये येऊन व्यवहार करतात. त्यामुळे दलाली, भरणी उतरणी, प्रवासाचा खर्च कमी होतो ज्यादा चे चार पैसे या लोकांच्या हातात पडतात. मिळालेल्या चार पैशातून पावसाळभर लागणारे संसारोपयोगी साहित्याची बेगमी केली जाते. मार्केटचा विचार करता बाजारभाव चांगला असेल तर दलाली, भरणी खर्च वगळता चार पैसे मिळून जातात. कधी कधी बाजार भाव पडला तर पदरमोड ही करावी लागते. मार्केटमधील लोकांचा विचार करता ५०ते ६० टक्के लोक हे धामणी खोऱ्यातील असतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाते. मृगाचा पाऊस सुरू झाल्यावर ग्रामीण भागातील शेतकरी शेताच्या आजूबाजूला त्याची लागवड करतो. वेगळी अशी मेहनत करावी लागत नाही.रासायनिक खतांचा उपयोग ही करावा लागत नाही.पालापाचोळा , जनावरांचे शेण हेच खत वापरून मोठ्या प्रमाणात बांबू येतात.उत्पादक शेतकऱ्यांना देखील आर्थिक फायदा होतो. भूमिहीन , शेतमजुरांच्या जगण्याचा आधार ही बांबू काठी ठरत .

🤙 8080365706