
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होत आहे. पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. पाटील यांची चौकशी होणार असल्याने ईडी कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत ईडी कारवाईचा निषेध नोंदवला आहे. ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे काही गोष्टी सोसावा्या लागणारच, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली आहे.

जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. काही लोकांना वेगवेगळ्या टोलनाक्यावर थांबवलं आहे. सर्वांनी शांत राहावं. मला जे काही विचारलं जाईल त्याची उत्तरं दिली जाणार आहेत. चिंतेचं काही कारण नाही. सर्वांनी शांतता राखा, असं सांगतानाच आपण विरोधी पक्षात आहोत. काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.
