कला आयुष्याला समृध्द करते : प्रा. संभाजी पाटील

कोल्हापूर : आयुष्यामध्ये पुढे जात असताना संस्कार आणि विचारांची पातळी चांगली असायला हवी. यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. तरुणाई मध्ये जग जिंकण्याची खूप मोठी शक्ती आहे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन एखादे क्षेत्र निवडल्यास यश नक्कीच मिळते. मनाने स्वतः चा पुरस्कार करायला हवा तरच आत्मविश्वास निर्माण होतो. नशीब हे हातांवरील रेषांवर अवलंबून नसते तर ते तुमच्या प्रामाणिकपणे केलेल्या कष्टावर अवलंबून असते. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याचा चढता आलेख महाराष्ट्राला ज्ञात आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली म्हणूनच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. गुणात्मक विकासाबरोबर कलेची आवड असल्यास आनंदी जीवन जगता येते. यामुळे कला आयुष्याला समृध्द करते. असे प्रतिपादन सातारा येथील राष्ट्रीय कुस्तीगीर खेळाडू प्रा.संभाजी पाटील यांनी केले.

ते विवेकानंद कॉलेजच्या गुणी विद्यार्थी गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी हिंदी, मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, गुणी विद्यार्थी गौरव समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते व इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत राहते. विवेकानंद कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या पंचसुत्रीचा अवलंब करुन महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक वाढवावा. माणसाने माणसाला माणसासारखे वागविले पाहिजे ही जाणिव विद्यार्थ्यांनी सतत वृध्दिंगत केली पाहिजे, असे मत मांडले.

याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्या कोल्हापूर परिक्षेत्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी, विवेकानंद कॉलेजची माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. विवेकानंद कॉलेजने केलेल्या संस्कारांमुळेच माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. आजच्या तरुणाईने मिडीयाच्या आहारी न जाता जीवनात आपले ध्येय ठरवून त्यादृष्टीने चिकाटीने प्रयत्न करुन जीवनात यशस्वी व्हावे,असे विचार मांडले.यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, एन.सी.सी. व एन.एस.एस. विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव चिन्ह व ट्रॅकसूट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमास डॉ.श्रुती जोशी, प्रा. सुनिता भोसले, प्रा .जे .आर भरमगोडा, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार सी.बी.दोडमणी तसेच प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706