वाघबीळ जवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

पन्हाळा : पडवळवाडीच्या हद्दीत नलवडे बंगल्याजवळ भरधाव कारने समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

हा अपघात शनिवारी (दि. १५) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडला. अमोल बाबासो चिले (वय ४०, मूळ रा. जेऊर, ता. पन्हाळा, सध्या रा. कुंभारवाडी, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव असून कारचालक सिद्धेश विक्रम मोरे (वय २७, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.करवीर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जेऊर येथील अमोल चिले हे गेल्या काही दिवसांपासून कुंभारवाडी येथे सासरवाडीत राहत होते.

कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात ते काम करीत होते. कामावर जाण्यासाठी शनिवारी पहाटे ते कुंभारवाडी येथील घरातून दुचाकीवरून बाहेर पडले. वाघबीळ घाटाजवळ नलवडे बंगल्यासमोर कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते दुचाकीसह १५ ते २० फूट अंतरावर उडून पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

🤙 8080365706