
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम व पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) अ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.
श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सामन्यांची सुरुवात उद्योगपती अभय देशपांडे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संजय लाड, नितीन ओसवाल, सिद्धार्थ देशमुख, गणेश शिंदे, अनिल अदिक, निवास चौगुले, श्रीकांत चव्हाण, रवी जानकर, शैलेश इंगवले, समृद्धी बारटक्के यांच्या प्रमुख उपस्थित झाली.आजच्या दिवसातील पहिला सामना खंडोबा तालीम विरुद्ध कोल्हापूर पोलीस यांच्यात खेळला गेला. या सामन्यात खंडोबाने कोल्हापूर पोलीसचा ३-० असा पराभव केला.खंडोबाच्या संकेत मेढेने १३ व्या मिनिटाला आणि पूर्वार्धातील जादा वेळेत ४२ व्या मिनिटाला अबूबकरने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत बालगोपालने २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात सेफाहने ५६ व्या मिनिटाला गोल केला. पूर्णवेळेत खंडोबा संघाने कोल्हापूर पोलीस संघाचा ३-० असा पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खंडोबा संघाच्या दर्शन पाटील याची निवड झाली.
आजच्या दिवसातील दुसरा सामना झुंजार क्लब विरुद्ध पीटीएम अ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पीटीएम अ संघाने झुंजार क्लबचा ३-० असा पराभव केला. हा सामना मध्यंतरापर्यंत गोल शून्य बरोबर होता. उत्तरार्धात ६३ व्या व्हिक्टर जॅक्सनने, ६६ व्या ओंकार मोरे ७२ व्या ओंकार पाटील याने गोल केला. पूर्णवेळेत पीटीएम अ संघाने झुंजार क्लबचा ३-० असा पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पीटीएम अ संघाच्या रोहीत देसाई याची निवड झाली. ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू शाम देवणे व बापू घाटगे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.यावेळी तायक्वांदो खेळाडू समृद्धी सचिन बारटक्के हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तायक्वांदो मध्ये तिने जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
