
कोल्हापूर : देशातील प्रत्येक रुग्णालयात रुग्णहक्काच्या सनदीची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्यामार्फत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात आले.
प्रत्येक रुग्णालयात दरपत्रक सक्तीचे करण्यात यावे, अशीही मागणी जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्याकडून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत यादव म्हणाले ,देशातील प्रत्येक रुग्णालयात रुग्ण हक्काच्या सनदीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे .प्रवेश शुल्क, वैद्य शुल्क ,भुल शुल्क, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, प्रतिदिन अंतर रुग्णदर ,शस्त्रक्रिया गृहशुल्क अशा अन्य सेवांचे दर पत्रक रुग्णालयांनी दर्शनी भागात लावावे. याचबरोबर रुग्णांनीही आपली जबाबदारी नीट पार पाडून आरोग्याशी संबंधित सर्व माहिती रुग्णालयाला दिली पाहिजे. तपासणी उपचारादरम्यान डॉक्टरांना सहकार्य केले पाहिजे.तसेच रुग्णालयातील सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे.यावेळी या आंदोलनात रवी देसाई ,कॉ. चंद्रकांत यादव, रेखा पाटील ,मंगल खाब्रे, योगेश सनदी, तायाप्पा कांबळे, रंजना शिंदे, कोजीबा कांबळे ,दामाजी पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
