
कोल्हापूर : राजाराम कारखाना म्हणजे सभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या घामावर उभारलेले श्रमाचे मंदिर आहे. गेली 28 वर्षे या मंदिरात आम्ही सर्व संचालक प्रामाणिकपणे सेवा देत आहोत.पण काही स्वार्थी लोक सभासदांनी उभारलेले आणि जपलेले हे मंदिर बळकावू पाहत आहेत.
त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. सभासद हिताच्या पायावर उभारलेली राजारामची पवित्र वास्तू विरोधकांच्या हाती जाऊ देऊ नका अशी भावनिक साद अमल महाडिक यांनी सभासदांना घातली. करवीर तालुक्यातील पिरवाडी,आरळे, घानवडे दिंडनेर्ली या गावातील सभासदांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. आजतागायत जात-पात, गट-तट, पक्ष असा कोणताही भेदभाव न करता सभासद शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही पारदर्शी कारभार केला. शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
आज कारखान्याच्या कामगारांचे पगार वेळेवर होतात. कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची बिले वेळेवर जमा होतात. असे असताना विरोधक केवळ सुडाच्या राजकारणातून बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन अमल महाडिक यांनी केले.यावेळी विलास बेडगे, महादेव पाटील, तानाजी पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, कृष्णात धोत्रे, विलास पोवार, संजय जाधव, शिवाजी यादव, संभाजी देसाई, ज्ञानदेव देसाई, मधुकर देसाई, बाबुराव पाटील, शिवाजी सुतार, शिवाजी तेली, तानाजी एकले, शहाजी चौगुले, कृष्णात डोंगळे आदींसह सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
