
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज, बुधवारी (दि.५) होत आहे.यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजराने आत्ताच जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सासनकाठीची पूजा होईल. सायंकाळी पालखी सोहळा होईल.
कोल्हापूरचा रक्षक देवता वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा म्हणजेे सर्वसामान्य लाखो भाविकांचे आराध्य दैवत. महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रसह देवाची सर्वदूर ख्याती. अनेकांचे हे कुलदैवत. देवाची दरवर्षी चैत्रात सर्वात मोठी यात्रा भरते. तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज, बुधवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील.
